Pages

Monday, December 2, 2013

आपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे !

लॉर्ड मॅकालेने म्हटले होते : ’
मी येथील शिक्षण-पध्दतीत असे काही संस्कार टाकून जात आहे की येणार्‍या काही वर्षात भारतवासी आपल्याच संस्कृतीची घृणा करू लागतील....मंदीरात जाणे पसंत करणार नाहीत.... आई-वडीलांना नमस्कार करण्यात त्यांना स्वत:ला अपमान वाटेल...ते शरीराने तर भारतीय असतील पण मन बुध्दीने आमचेच गुलाम असतील....’
आपल्या शिक्षण-पध्दतीत मॅकालेने टाकलेल्या संस्कारांचा प्रभाव आज स्पष्टपणे दिसून येत आहे. आजचे विध्यार्थी शिकून-सवरून पदवी घेऊन बेरोजगार होऊन नोकर बनण्यासाठी भटकत राहतात.
 महात्मा गांधींच्या शब्दांत : "कोट्यावधी लोकांना इंग्रजी शिक्षण देणे हे त्यांना गुलामीत टाकण्यासारखे आहे.मॅकालेने शिक्षणाचा जो पाया रोवला, तो खरोखरच गुलामीचा पाया होता. ही काय कमी अन्यायाची गोष्ट आहे की आपल्या देशात जर मला न्याय हवा असेल तर मला इंग्रजी भाषा वापरावी लागेल ! भारताला गुलाम बनविणारे तर आपण इंग्रजी जाणणारे लोक आहोत. प्रजेचा तळतळाट इंग्रजांना नव्हे तर आपल्यालाच लागेल." इंग्रजीचा आपल्या जीवनावर किती दुष्प्रभाव पडतो, याविषयी गांधीजींनी म्हटले आहे :
"विदेशी भाषेतून शिक्षण घेताना जे ओझे डोक्यावर पडते ते असह्य आहे. हे ओझे केवळ आपली मुलेच उचलू शकतात परंतू त्याची किंमत त्यांनाच चुकवावी लागते. ती दुसरे ओझे उचलण्याच्या लायकीची राहत नाहीत. यामुळे आपले पदवीधर बहुतांशी कामचुकार, अशक्त, निरुत्साही, रुग्ण आणि कोरे नक्कलबाज बनतात, त्यांच्यातील संशोधन शक्ती, विचार करण्याची शक्ती, साहस, धैर्य, शौर्य, निर्भयता इ. गुण खूपच क्षीण होतात. यामुळे आपण नव्या योजना आखू शकत नाही. काही, आखल्यातरी त्या पूर्ण करू शकत नाही.
काही लोकांमध्ये वरील गुण दिसून येतात, ते अकाल मृत्यूला बळी पडतात.”
 गांधीजी पुढे म्हणतात : "आईच्या दुधासोबत जे संस्कार मिळतात आणि जे गोड शब्द ऐकू येतात, त्यांच्यात आणि शालेय शिक्षणात जो सुमेळ असला पाहीजे, तो विदेशी भाषेतून शिक्षण घेतल्याने तुटून जातो. आपण अशा शिक्षणास बळी पडून मातृद्रोह करतो."

रविंद्रनाथ टागोरांनीही मातृभाषेचा अत्यंत आदर केला. त्यांनी म्हटले होते : "आपल्या मातृभाषेत शि़क्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे की नाही अशा प्रकारची चर्चा होणेच निरर्थक आहे." त्यांची मान्यता होती की 'ज्याप्रकारे आपण आईच्या कुशीत जन्म घेतला आहे, त्याचप्रकारे मातृभाषेच्या कुशीत जन्म घेतला आहे. या दोन्ही माता आपल्यासाठी सजीव आणि अत्यावश्यक आहेत.

गांधीजींनी मातृभाषा-प्रेम व्यक्त करताना म्हटले की "माझ्या मातृभाषेत कितीही चुका का असेना, मी त्या मातृभाषेला अगदी तसाच कवटाळून राहीन, जसे मूल आईच्या छातीशी कवटाळून राहते. तीच मला जीवनदायी दूध देऊ शकते. मी इंग्रजीला तिच्या जागी प्रेम करतो परंतु इंग्रजी माझ्या मातृभाषेचे स्थान हिरावून घेऊ पाहते ज्याची ती हक्कदार नाही. यामुळे मी इंग्रजीचा आवर्जून तिरस्कार करेन. मी या भाषेला केवळ बोलीभाषेच्या रूपात स्थान देईन परंतु विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात, शाळांमध्ये नाही. ती काही लोकांच्या शिकण्याची बाब असू शकते, लाखो-करोडोंची नव्हे !

रशियाने इंग्रजीशिवायही विज्ञानात इतकी प्रगती केलेली आहे. आज आपल्या मानसिक गुलामगिरीमुळेच आपण हे मानू लागलो आहोत की इंग्रजीविना आपले काम होणार नाही. मी या गोष्टीशी जराही सहमत नाही." विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देणे हे मानसशास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोणातून अत्यावश्यक आहे. कारण शाळेत आल्यावर मुले जेंव्हा आपली भाषा व्यवहारात आलेली पहातात तेंव्हा ते शाळेप्रती आत्मीयतेचा अनुभव करू लागतात. त्याचबरोबर त्यांना सर्वकाही जर त्यांच्याच भाषेत शिकविले तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी समजणे अगदी सोपे होते.

भारतेंदू हरिश्चंद्र यांनीही 'निज भाषा' म्हणून मातृभाषेचे महत्व व प्रेम आपल्या खालील सुप्रसिध्द दोंह्यांच्या रुपात व्यक्त केले आहे : निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल I बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल II उन्नति पूरी है तबहिं, जब घर उन्नति होय I निज शरीर उन्नति किये, रहत मूढ सब कोय II

रवींद्रनाथ टागोरांनी जपानचा दृष्टांत देताना सांगितले की "या देशाची जितकी प्रगती झाली आहे, ती त्यांच्या जपानी भाषेमुळेच झाली आहे. जपानने आपल्या भाषेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि इंग्रजीच्या प्रभुत्वापासून जपानी भाषेला दूर ठेवले." जपानी लोक यासाठी धन्यवादास पात्र आहेत कारण जेव्हां ते अमेरिकेत जातात तेव्हां तेथेही आपल्या मातृभाषेतच बोलतात.....आणि आपण भारतवासी !

भारतात राहत असूनही आपल्या मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमध्ये इंग्रजी शब्दांची भेसळ करतो. गुलामगिरीच्या मानसिकतेने अशी वाईट सवय लावली आहे की तिच्याशिवाय राहवत नाही. स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षाहूनही जास्त काळ लोटला, बाह्य गुलामगिरीच्या बेड्या तर तुटल्या पण ही आंतरिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी अजूनपर्यंत गेलेली नाही. रवींद्रनाथ टागोरांनी चिंतन करताना सर्वसामन्य लोकांसाठी हा महत्वाचा विचार व्यक्त केला आहे की 'अनावश्यक गोष्टीस जितक्या प्रमाणात आपण अत्यावश्यक बनवू तितक्याच प्रमाणात आपल्या शक्तीचा र्‍हास होत जाईल. युरोपसारखे आपल्याकडे संबळ नाही. युरोपिअन लोकांसाठी जे सुलभ आहे, आपल्यासाठी तेच ओझे होते. सुगमता, सोज्ज्वळता आणि सहजता हीच खरी संस्कॄती आहे. आत्यधिक आयोजनाची जटिलता एक प्रकारचा अत्याचार आहे.' म्हणून आपल्या मातृभाषेचा महिमा ओळखा आपल्या मुलानां इंग्रजीत शिक्षण देऊन त्यांच्या विकासात अडथळा आणू नका. त्यांना आपल्या मातृभाषेत शिकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हा. कोणीही असे माता-पिता नसतील, जे आपल्या मुला-मुलींचे कल्याण वा प्रगतीची इच्छा करणार नाही. ते करतातच, केवळ गरज आहे तर आपली विचारधारा बदलण्याची !

1 comment:

  1. 😊 मातृभाषा रक्षणासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत👌👍✌

    ReplyDelete