Pages

Sunday, December 1, 2013

इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता ???

जन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्‍या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची "जनकलियाण" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्‍या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्‍याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि "जनकलियाण" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय? शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय? पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो? याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय? तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची? आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो? उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय? प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल? आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना? आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात? मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे? मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते? या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.

No comments:

Post a Comment