Pages

Monday, December 2, 2013

इंग्रजी माध्यमाचा अट्टहास का ???

हल्ली भारतात (खास करून महाराष्ट्रात)सर्वसाधारणपणे सर्व थरातील पालकांनी आपल्या पाल्यांना पूर्व-प्राथमिक धरून सगळे शिक्षण इंग्रजीतून देण्याचा चंगच बांधलेला दिसतो. जणू काय ‘शिक्षण म्हटले की ते इंग्रजीतूनच झाले पाहिजे’ आणि ‘इंग्रजीतून शिक्षण हेच फायदेशीर आहे’ असे गृहितच धरले आहे. एकदा एखादी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो की तिच्या अन्य बाजू नजरेआड केल्या जातात. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याचे तोटे जरी समोर आले तरी त्या संबंधीची चर्चा टाळली जाते किंवा भरमसाट पैसे मोजल्यामुळे हे तोटे कबूल करण्याची हिंमत नसते. ‘इंग्रजी ही जागतिक भाषा’, ‘इंग्रजीतून शिकल्यामुळे प्रगती’ अशी मानसिकता घडल्यामुळे तोटे दिसले तरी त्याची जबाबदारी न घेता उलट त्या दुष्परिणामांचे खापर बापड्या मुलांवरच फोडले जाते. ‘मुलं शिकतच नाहीत’चे पालुपद लावतात व मोकळे होतात. भंपक प्रतिष्ठेची झापडे लावलेल्या पालकांकडून शिक्षणाच्या माध्यमाचा सारासार विचार होणे नाही. परक्या भाषेतून जी भाषा शिकल्याशिवाय बोलताही येत नाही, ती परकी भाषा. अशा परक्या भाषेतून शिकताना मुलांना कशा प्रकारची कसरत करावी लागते, याचे भान पालकांना राहत नाही किंवा जाणूनबुजून ते दुर्लक्ष तरी करीत असावेत. माध्यमाच्या आकर्षणामुळे बहुसंख्य लोकांना इंग्रजी हवे आहे. लहान वयात अगदी सहजतेने मुले आठ-दहा इंग्रजी गाणी (नर्सरी र्‍हाईम्स) म्हणतात. ए-बी-सी-डी तोंडपाठ म्हणतात. ते ऐकून आई-बाबांना वाटते की, आता या मुलाला इंग्रजी माध्यमात घालायला काहीच अडचण नाही. मुले तिसरीत-चौथीत पोहोचली की लक्षात येते की, इंग्रजीमुळे आपल्या मुलाची प्रगती खुंटते आहे. शाळेतील सर्व विषय इंग्रजीतून शिकायचे असल्यामुळे त्यांचा अभ्यास कित्येकवेळा अतिशय कष्टप्रद होतो. पदरात काय पडते तर घोकंपट्टी व पोपटपंची. हे सगळे करवून घेण्यासाठी पूर्व प्राथमिकपासून ट्यूशन क्लासेस! त्यामुळे मुले कुठल्याच विषयावर स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत. स्वतंत्र विचार म्हणजे काय हेच त्या बिचार्‍यांना माहीत झालेले नसते. त्यामुळे एकूण शिक्षणावरच मर्यादा पडतात. कधी कधी सहावीपर्यंतचा काळ जातो. पण या वयात धड ना इकडचे ना तिकडचे होऊन मुले त्रिशंकू होतात. परतीचे दोर तर केव्हाच कापलेले असतात. परक्या भाषेतून शिक्षण घेताना मुलांना सोसावा लागणारा हा सर्वांत मोठा तोटा होय. मुलांची स्थिती दयनीय होते. काही मुले वैफल्यग्रस्त होतात. बर्‍याचजणांचे लक्ष अभ्यासावरून पुरते उडालेले असते. अंगात एक प्रकारची बेफिकिरी आणि त्याच बरोबरीने अपरिहार्यपणे येणारा कोडगेपणा, यामुळे आई-वडील अत्यंत चिंताग्रस्त, संतापी आणि हतबल बनतात. त्याचबरोबर निराश किंवा बेफिकीर मुले यामुळे कुटुंबाचे स्वास्थ्य हरवून बसतात. कदाचित याच कारणासाठी मुलाला चौदा वर्षेपर्यंत शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याच्या संविधानात दिलेल्या वचनपूर्तीसाठी सरकारने ‘शिक्षण हक्क कायदा’ केलेला असावा. या कायद्यानुसार विद्यार्थ्याला म्हणे आठवीपर्यंत नापास करता येत नाही. म्हणजे सहाव्या वर्षी पहिलीत आलेला विद्यार्थी वयाच्या चौदाव्या वर्षीपर्यंत ‘आठवी पास’ झालेला असेल. वयाची चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलाला शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याचे संविधानातले वचन पाळल्याचे समाधान! पुण पुढे काय? ते मूल काय शिकलेय? त्याच्या ज्ञानाचा स्तर काय? ते पुढे दहावीपर्यंत-पदवी पर्यंत पोचते का? देशाला चांगले जबाबदार नागरिक मिळण्यासाठी त्यांच्याकडे सरकारने व्यवस्थित लक्ष द्यायला नको काय? एका पाहणीत असे दिसून आले आहे की, प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १० टक्के मुले मॅट्रीकपर्यंत पोचतात आणि या दहा टक्क्यातील फक्त चार टक्के पदवीपर्यंत पोहोचतात! या मागचे कारण काय असेल? या कारणाच्या मुळाशी पोचणे म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण का आवश्यक आहे? या प्रश्‍नाच्या उत्तराकडे पोचणे आहे. याआधारे विचार करताना स्पष्ट होते की, परक्या भाषेतून निर्माण झालेला आशय प्रभावी पद्धतीने मनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा आशय पाठ करूनच स्मरणात ठेवण्याची सवय लागते. ‘अभ्यास म्हणजे पाठ करणे आणि परीक्षेला ओकून टाकणे’ असे समीकरण यामुळेच झालेले आहे. कोणत्याही विषयाचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी स्वतःचा आशय निर्माण करणे आवश्यक आहे आणि हे मातृभाषेतूनच साध्य होऊ शकते. मुळातच काहीही सुचते ते सुचण्याची भाषा ‘मातृभाषाच’ असते. ती मुलांमधली सर्जनशीलता फुलवत नेते. परक्या भाषेतून सर्व समजून घेताना, समजलेले व्यक्त करत असताना त्यातली सहजता नष्ट झाल्याने ही प्रक्रिया यांत्रिकपणे होते आणि बालवयापासूनच म्हणजे ‘घडणीच्या’ वयापासून त्यांच्या अंगात ही यांत्रिकपणा भिनते. याउलट मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी लाभल्यावर सभोवतालच्या विविधांगी अनुभवांना सक्षमपणे भिडता येते. मेंदूतील विविध ग्रहण क्षमता आणि जाणिव समृद्ध होत जातात. यशपाल समितीच्या अहवालातील हीच गोष्ट सूचित करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रुसो म्हणतात, ‘प्रौढांनी दडपण आणल्यामुळे बालकांच्या स्वतःच्या आवडीनिवडी व भावना दडपल्या जातात आणि मग त्यांच्यात कृत्रिमता व खोटेपणा निर्माण होतो.’ मुलांचा विचार ‘मूल’ म्हणून केला पाहिजे. आपण ठरविलेल्या फुटपट्‌ट्या लावून तो बंद करू नका. हे सांगणार्‍या जगभरातील शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यातील तथ्य संवेदनशिलतेने जाणून घेतल्यास मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व उलगडत जाते. प्रत्येक मूल हे वेगळे असते. अगदी जुळी मुलेसुद्धा. प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र विचारपद्धती आणि क्षमता असते. त्यांच्या आधारे आणि स्वतःला येणार्‍या अनुभवांच्या सहाय्याने ते शिकत जाते. या सबंध प्रक्रियेत पाय रोवून उभे राहण्यासाठी मुलांना मातृभाषेतून शिक्षणाची भक्कम जमीन हवी असते. पण इंग्रजीसारख्या परक्या माध्यमात मुलांना ढकलून त्यांच्या पायाखालची ही जमीनच पालक हिरावून घेत आहेत. मातृभाषा ग्रहण करण्यात जर त्रुटी राहिली किंवा तिच्यापासून मुलांना दूर करण्याचा प्रयत्न केला किंवा करत राहिलात तर त्यांच्या भाषाविकासात अडथळे येतीलच. त्याशिवाय अन्य विषयांच्या ग्रहणातही हे अडथळे अडसर ठरतात. कोणत्याही विषयांतील संकल्पना मातृभाषेच्याच आधारे अधिकच सुस्पष्ट होतात. अन्यथा त्या पाठ करून स्मरणात ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे त्या संकल्पना समजून घेण्यातला आनंद हरवतो व त्यांच्या गाठोड्याचा भार वाहणे एवढेच उरते. पुष्कळवेळा वाटचालीत ते गाठोडे हरवते वा त्यांत साठवलेल्या संकल्पनांचा विसर पडतो. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. कृष्णकुमार यांनी म्हटले आहे, ‘भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसते तर कल्पनाशक्तीच्या विकासाचे व विचार शक्तीच्या विकासाचे एकमात्र साधन असते.’ मातृभाषेतून शिक्षण घेण्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन तो समाजाशी, देशाशी व संस्कृतीशी पूर्णतः जोडला जातो.

No comments:

Post a Comment