Pages

Saturday, November 30, 2013

राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे


नवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.
मराठी शाळांवरील बंदी तात्पुरती असून बृहत् आराखडा तयार झाल्यानंतर मराठी शाळांना परवानगी देण्याचा विचार करू असा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत असले तरी मुळात मागेल त्याला इंग्रजी शाळा व मराठी शाळांच्या परवानगीला स्थगिती हा आगाऊपणा झालाच कसा; हा प्रश्न उरतोच. मागे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठी शाळा हे एक ओझे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता लोकांनाच मराठी शाळा नको आहेत तर शासन दुसरे काय करणार; असा बचावही शासनामार्फत केला जातो. लोकांची मागणी लक्षात घेऊन काही महापालिकांनी मराठी शाळांचे इंग्रजी शाळांत रूपांतर केलेलेही आपण पाहातो. हे काय चालले आहे? आणि याची परिणती कशात होणार आहे? यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का? इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत? लोकांना मराठी शाळा खरेच नको असतील तर त्या का नको आहेत, याचा शासनाने कधी विचार केला आहे काय?
मराठी शाळा दोन कारणांसाठी आवश्यक आहेत. एक - मातृभाषेतून शिकण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आणि दोन - मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी.
मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेला व्यक्तिगत व सामाजिक परिमाणे आहेत. व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा, तर्कबुद्धीचा जलद व स्वाभाविक विकास तिची जन्मापासून सोबत करणार्‍या मातृभाषेत जितका होईल तितका तो परभाषेतून होणार नाही. शिक्षण हे जर माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण असेल तर ते सिद्ध होण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. शिक्षणातील आणि एकूणच मानवी जीवनातील मातृभाषेचे हे महत्त्व ओळखून तिला मातृभूमीप्रमाणे व्यक्तिगत, तात्कालिक उपयुक्ततेपलीकडचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हा व्यक्तीचा केवळ विशेषाधिकार न राहता ते एक सामाजिक, सांस्कृतिक दायित्वही बनते. मातृभाषेतून न शिकल्यामुळे व्यक्तिविकासाला मर्यादा तर पडतातच; पण एका अलिखित सामाजिक कराराचा भंगही होतो. महाराष्ट्रात मराठी शाळांतून शिकणे हा एक सामाजिक करार आहे आणि त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.
मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नही आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती केवळ प्रशासकीय सोय नव्हती तर जगातील प्रमुख २५ भाषांपैकी एक आणि थोर ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या स्वतंत्र राज्याची स्थापना होती. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे आणि तो पार पाडायचे म्हणजे मराठी भाषेचा शक्य तितक्या सर्व व्यवहारांत गुणवत्तापूर्ण वापर करणे. असा वापर करायचा म्हणजे मराठी शिकणे व शिकवणे आलेच. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार कोणत्याही भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असतो. भाषेचे पिढ्यांतर्गत संक्रमण कोणत्याही भाषेच्या अस्तित्वाच्या व विकासाच्या केंद्रस्थानी असते असे भाषेचे अभ्यासक सांगतात. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे भाषेचे संक्रमण करण्यासाठी ती भाषा शिक्षणाचे माध्यम असावी लागते. केवळ एक विषय म्हणून तिचा अभ्यास पुरेसा नाही. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार नसेल तर तिच्या अन्य व्यवहारांना उत्तरोत्तर गळती लागते व ते कालान्तराने नष्ट होतात. मराठी नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता व अन्य सार्वजनिक व्यवहार हे मराठी शिक्षणावर आणि अधिक नेमकेपणाने बोलायचे तर मराठी शाळांवर अवलंबून आहेत. जणू मराठी शाळा या मराठी भाषेची मुळे आहेत, तीच नष्ट झाली तर मराठी भाषावृक्षाचा वरचा विस्तार हळूहळू मातीला मिळेल. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमाबाबत तटस्थ राहून मागणी तसा पुरवठा असे धोरण स्वीकारता येणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक ओळख आहे. ती अबाधित व वर्धिष्णू ठेवायची असेल तर मराठी शाळांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला पाहिजे. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजी भाषेचे प्रस्थ, शिक्षणाचे खासगीकरण, मराठीशी सोयरसुतक नसलेल्या अन्य भाषकांचे राज्यातील वाढते स्थलांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव यामुळे मराठी भाषेपुढे न भूतोअसे आव्हान उभे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी होती. आता तेवढीच मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे ती मराठी राज्य टिकविण्यासाठी. भाषेकडे तटस्थपणे पाहणार्‍यांना आणि स्वभाषेविषयी कसलाच मूल्यभाव नसणार्‍यांना ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण मराठी शाळांची ही लढाई आपण हरलो तर मराठीची अख्खी लढाई आपण हरल्यासारखे आहे. मराठी शाळा हा मराठीचा आत्मा आहे. तो जपला पाहिजे.
मात्र राज्यशासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे आपले धोरण बदलले तरी मराठी शाळा टिकतील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मराठी शाळांचा लोकाश्रय वाढून त्यांना इंग्रजीप्रमाणे सामाजिक स्वीकृती व प्रतिष्ठा मिळायची असेल तर पन्नास टक्के सक्ती आणि पन्नास टक्के संधी हे धोरण स्वीकारावे लागेल. लोकांना इंग्रजी शाळा का हव्यात? त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून? मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली? साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी? गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला? या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली? मराठीचे व्यावहारिक कुपोषण करून जगण्यासाठी एक निरुपयोगी भाषा अशी तिची प्रतिमा कोणी निर्माण केली?
मराठी माणूस मराठी शाळांपासून खुशीने दूर गेलेला नाही, तर राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठीचे काही खरे नाही अशी हाय खाऊन त्याने इंग्रजी शाळांचा रस्ता धरलेला आहे. केवळ उच्चभ्रूच नव्हे तर तळागाळातील लोकांनीही आपल्या सामाजिक आणि आर्थिक अभ्युदयाची भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण इतके वाढले की मराठीवरील प्रेमापोटी मुलांना मराठी शाळांत पाठवणारे पालक मागासलेले व वेडे ठरू लागले! अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही?’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय?’’ पोटा-पाण्याचे व्यवहार ज्या भाषेत होत नाहीत ती भाषा कोण आणि कशासाठी शिकणार?
मराठी शाळा वाचवायच्या असतील तर शाळांवर इलाज करून चालणार नाही; त्यासाठी व्यवहारातील मराठीवर इलाज करावा लागेल. मराठी भाषेचे व्यावहारिक, आर्थिक सक्षमीकरण करावे लागेल. म्हणजे प्रशासनाप्रमाणेच राज्यांतर्गत उद्योग, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च व व्यावसायिक शिक्षण, न्यायालयीन व्यवहार यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबिण्यात काहीही गैर नाही. पण आपल्याकडे मराठीच्या बाजूने कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विद्यापीठांनी मराठीतूनही उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे विद्यापीठ कायदा सांगतो; पण प्रत्यक्षात विद्यापीठांनी इंग्रजीच्या वर्चस्ववादाला खतपाणी घातले. राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाड्यांसह संपूर्ण कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून करावे असा राज्य शासनाचा व उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पण तो संबंधितांनी धाब्यावर बसवला. राज्यातील केंद्रीय आस्थापनांनी आपल्या कामकाजात त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करावा अशी तरतूद असताना लिपिसाधर्म्याचा फायदा घेऊन केवळ इंग्रजी-हिंदीचा वापर करून मराठीची फसवणूक केली. मराठीच्या या व इतर व्यावहारिक अवमूल्यनामुळे लोकांची अशी समजूत झाली की, यापुढे इंग्रजी हीच व्यवहारभाषा असणार आहे. आपल्या राज्याला कसले भाषाधोरण नसल्याचा हा पुरावा आहे आणि आता तर लोकांनाच मराठीऐवजी इंग्रजी शाळा हव्या आहेत; असे सांगून राज्यकर्ते स्वत:च्या पापाचे खापर लोकांच्याच डोक्यावर फोडत आहेत.

माझी बोली माझा विकास

मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या ‘लोकप्रभा’च्या वाचकांकडून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अनेक पत्रं आली. या वाचकांनी त्यांचं करिअर उत्तम पद्धतीने घडवलं आहे आणि हे करिअर करताना इंग्रजी भाषेतून शिक्षण न मिळाल्याचा त्यांना कोणताही पश्चात्ताप वाटत नाही.

अतुल कुलकर्णी -अभिनेता 

मातृभाषेतून शिक्षण घेणं हे केव्हाही फायद्याचं असतं. त्याचा तुम्हाला पुढच्या वाटचालीत नक्कीच फायदा होतो. जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्या भाषेत शिक्षण होणं हे केव्हाही गरजेचं आहे असं मला वाटतं. केवळ माझंच नाही तर अनेक शिक्षणतज्ज्ञांचंही हेच मत आहे

आपल्या भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक प्रांतवार आणि प्रदेशवार भाषा बदलते. त्यामुळे मला असं वाटतं, आपल्याकडे भाषेची अवस्था खरोखरच खूप कठीण आहे. पहिलं कारण काय, तर आपण मुळातच खूप भाषा बोलतो. दुसरं कारण म्हणजे अर्थातच एक देश आणि त्याची एक भाषा म्हणून आपण हिंदीला महत्त्व देतो. सर्वसामान्यपणे आपण हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण हिंदी या भाषेलाही आपण महत्त्व देण्यात खूप यशस्वी झालोय असं मला वाटत नाही. त्यानंतरची भाषा म्हणजे इंग्रजी. इंग्रजी ही उच्चभ्रू वर्गाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे मर्यादित लोकांपर्यंतच ही भाषा पोहोचलेली आहे.
सोलापुरात माझं शिक्षण मातृभाषेतूनच झालं. शालेय शिक्षण सातवीपर्यंत मराठी माध्यमातूनच झालं. त्यानंतर गणित, विज्ञान हे विषय ८ वीपासून इंग्रजीतून शिकलो. अर्थात मातृभाषेतून शिक्षण घेणं हे केव्हाही फायद्याचं असतं. त्याचा तुम्हाला पुढच्या वाटचालीत नक्कीच फायदा होतो. जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्या भाषेत शिक्षण होणं हे केव्हाही गरजेचं आहे असं मला वाटतं. केवळ माझंच नाही तर अनेक शिक्षणतज्ज्ञांचंही हेच मत आहे. माझं शिक्षण सोलापुरात झालं त्या वेळी सोलापुरात उत्तम मराठी शाळा होत्या. त्या वेळी मुलगा इंग्रजी माध्यमातूनच शिकला पाहिजे असा आग्रह अजिबात नव्हता. आज मात्र काळ बदलला, त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्या वेळी मराठी शाळा उत्तम होत्या. आज मात्र ही परिस्थिती फारशी स्वागतार्ह नाही.
मनोरंजनाच्या क्षेत्रात आल्यावर मला भाषेवर मेहनत घेणं गरजेचं होतं. दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना तीन र्वष हिंदी डिक्शनवर खूप मेहनत घेतली. तिथं माझा आणि हिंदी भाषेचा परिचय खूप जवळून झाला. अनेक हिंदी नाटकांचा अनुभव तिथंच गाठीशी बांधता आला. त्यामुळे हिंदी हे एनएसडीमध्ये असतानाच उत्तम शिकता आलं. मुळात मला भाषेची आवड असल्याने भाषेवर मेहनत घेणं फारसं कठीण गेलं नाही. त्यामुळेच हिंदी चित्रपट करताना मला कुठंही काहीच अडचण आली नाही. कुठलीही भाषा येणं तर गरजेचं आहेच, पण ती जाणून घेणं हे त्यापेक्षा जास्त गरजेचं आणि अधिक फायद्याचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे भाषा कुठलीही असो, ती जाणून घ्यायला हवी. तरच आपल्याला भाषेचा अडसर कधीही जाणवणार नाही



बुद्धिविकासासाठी मातृभाषाच साह्य़भूत -डॉ. सुनील इनामदार शिक्षण : B.A.M.S., M.D.(AYU) ( Gold Medalist)
 माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. दहावीला पुण्यात नूतन मराठी विद्यालय या शाळेत होतो तेव्हा मला ८५ टक्के मार्क मिळाले होते ११वी, १२ वीचे शिक्षण सांगलीच्या वेिलडव कॉलेजमधून घेतले. तेव्हा मला ८७ टक्के मिळाले होते. नंतर नाशिकच्या आयुर्वेद महाविद्यालयमधून बी.ए.एम.एस. पूर्ण केले. त्या वेळी सुवर्णपदक मिळाले. एम.डी. करण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आलो. नंतर गुजरात आयुर्वेद विद्यापीठातून एम.डी. केलं. तिथेही सुवर्णपदक मिळालं. मग संस्कृत टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृतमध्ये बी.ए. केलं. कोल्हापूरमध्ये गेली १५ र्वष हॉस्पिटल चालवतो आहे. आयुर्वेद क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत Excellence of physician हा पुरस्कार महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला. खडीवाले वैद्य संस्था यांच्या तर्फे उत्कृष्ट Panchakarma Physician हा पुरस्कार देण्यात आला. आज करिअरमध्ये ही कामगिरी केल्यानंतर मला मराठीचा अभिमान वाटतो हे आनंदाने सांगावसं वाटतं. मातृभाषेत प्रशिक्षण घेतल्याने मला कोणत्याही पदव्युत्तर शिक्षणात अडचण आली नाही. सुरुवातीला थोडे अडल्यासारखं वाटलं पण नंतर जाणवलं की तो न्यूनगंड होता. विषय समजण्याचा आत्मविश्वास हा मातृभाषेतील शिक्षणामुळेच मिळाला आणि त्यामुळेच आयुष्यात पुढे यशस्वी होऊ शकलो. म्हणून मातृभाषेतच प्रत्येकाने भाषण व बुद्धीविकासासाठी प्रशिक्षण घ्यावे. माध्यमिक नंतर द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी भाषेतून प्रशिक्षण घेण्यास व्यवहारातही फायदा होऊ शकतो.

विषयाचे ज्ञान आत्मसात करण्यातील सोपेपणा - संदीप प्रभाकर देवरे शिक्षण : बी. कॉम., एलएल. एम.

माझे संपूर्ण शिक्षण मराठी मातृभाषेतून झाले आहे. १९८० साली दहावी महात्मा गांधी विद्यालय, उरळी कांचन (जि.पुणे) येथून केले. दहावीला मला ६५ टक्के गुण मिळाले होते. १२वीला कॉमर्स मराठी माध्यमातून गरवारे कॉलेजमधून ६२ टक्के मिळवून उत्तीर्ण केले. नंतर पदवी शिक्षण बृहन् महाराष्ट्र कॉलेज येथून पूर्ण केले तेव्हा सेकंड क्लास मिळवला होता. एलएल.बी. मी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून केला. त्या वेळी मला फर्स्ट क्लास मिळाला होता. नंतर पुणे विद्यापीठातून एलएल.एम.ही पूर्ण केले. गेली २२ वर्ष मी सेबीमध्ये आहे. सध्या माझी पोस्ट Joint legal adviser म्हणून आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मी सेबीचं प्रतिनिधित्व केलं. या परिषदेसाठी दुबई , स्पेन, न्यूयॉर्क, वॉिशग्टन इथे भाग घेतला. या सगळ्यात मातृभाषेतून शिक्षण झाल्याने माझं कुठेही अडलं नाही. माझ्या मते भाषेचा उपयोग संभाषणासाठी होतो. पण त्यासाठी आपल्या क्षेत्रातील विषयाचे सखोल ज्ञान आणि आत्मविश्वास महत्त्वाचे ठरतात. मराठी भाषेत शिक्षण घेताना कोणत्याही विषयाचे ज्ञान आत्मसात करण्यात सोपे जाते.

मातृभाषेतून शिक्षणाचा न्यूनगंड नाही - प्रतीक्षा पिंगळे

माझे शालेय शिक्षण चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालय, गिरगाव या मराठी शाळेतून झाले. नंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीला ७१ टक्के गुण मिळाले. पदवी परीक्षा ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. २००२ साली मी सी ए. झाले. त्यानंतर २०१० साली डिप्लोमा आय. एफ.आर.एस. मध्ये ए.सी.सी.ए (यू.के.) पूर्ण केला. सध्या मी आय.आय.एम. लखनौमधून Executive MBA करीत आहे. नोकिया लोकेशन अ‍ॅण्ड कॉमर्स ह्य़ा कंपनीत भारताच्या अकाऊंट टीम प्रमुख म्हणून मी काम करीत आहे. नोकरीतील माझी जबाबदारी नपुण्यरीतीने करीत असल्याबाबत मला GLOBAL IMPACT AWARD हा पुरस्कार २०१० साली मिळाला. माझे शिक्षण मराठी या मातृभाषेतून झालेले असले तरीही मला उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही. मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतले तरीही कॉलेजमध्ये पहिल्या दिवसापासून भीतीही वाटली नाही किंवा नंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना त्रास जाणवला नाही.

मातृभाषेतून शिक्षणाचा मर्यादित अभिमान -अवधूत साठे

मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतले, यूडीसीटीसारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी संस्थेतून केमिकल इंजिनीअर झालो आणि केंद्र सरकारच्या एका उपक्रमातून कार्यकारी निदेशक (Executive Director) या पदावरून निवृत्त झालो. हे पद निदेशक मंडळाच्या (Board of Directors) एक स्तर खाली असते व ते लक्षात घेऊन मी स्वत:ला करिअरमध्ये मर्यादित प्रमाणात तरी यशस्वी समजतो. मातृभाषेतून घेतलेल्या शालेय शिक्षणामुळे मला ज्युनिअर कॉलेज ( तेव्हाचे एफ.वाय. व इंटर सायन्स) मधे सायन्स विषय समजून चांगले मार्क मिळविण्यात काहीच अडचण जाणवली नाही. त्या मार्काच्या जोरावर मला यूडीसीटीसारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश मिळाला. परंतु वर्गातील इतर मुलामुलींबरोबर इंग्रजीतून संवाद साधताना अपुऱ्या शब्दभांडारामुळे एक न्यूनगंड जाणवे. हा न्यूनगंड पुढे नोकरीत इतर सहकाऱ्यांबरोबर कामाव्यतिरिक्त विषयावरील संवादांमध्येही जाणवे. परंतु हा न्यूनगंड मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतलेल्या इतर काही सहकाऱ्यांत आढळला नाही. माझ्या मते याची खालीलप्रमाणे दोन-तीन कारणे असावीत. एक म्हणजे माझ्या शाळेतील इंग्रजी विषय शिकविण्यातील त्रुटी, दोन म्हणजे त्यावर मात करण्यासाठी मी घेतलेली अपुरी मेहनत (इंग्रजी कथा-कादंबऱ्या वाचणे) आणि तीन म्हणजे माझी स्वतवरील विश्वासातील (confidence) त्रुटी. यासाठी मातृभाषेतून घेतलेल्या शालेय शिक्षणाला दोष देणे योग्य होणार नाही. परंतु मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी विषय शिकविण्यात सुधारणा करण्याची गरज यामुळे नक्कीच अधोरेखित होते. करिअरमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी सोशल नेटवìकगची गरज असते व ते करण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे जरुरी आहे. ते कदाचित इंग्रजी माध्यमातील शिक्षणाने सहज शक्य झाले असते, परंतु त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावे असे मी कधीही म्हणणार नाही. जबर महत्त्वाकांक्षा असणाऱ्या व्यक्तीला ते अधिक मेहनतीने इतर प्रकारे साध्य करणे शक्य आहे.

शिक्षणाच्या माध्यमनिवडीचा गोंधळ - ऋता राजेश हाटे

आजचे शिक्षण हे ज्ञानसंपदा वाढवण्याच्या दृष्टीने पांगळे आहे. कारण त्या ज्ञानातून शेवटी मिळते, ती कागदी पदवी, अनुभव नाही. अनुभवांच्या ज्ञानाची शिदोरी गाठी ना पाठी म्हणून अपयशी जीवनाची सुरुवात होते. आज ज्ञानाचा किंवा शिक्षणाचा विचार हा साधारणत: पुस्तकी शिक्षणाच्याच दृष्टीने व पशांच्या दृष्टीने केला जात आहे. म्हणूनच शिक्षणाचे माध्यम निवडताना इंग्रजीची निवड प्राधान्याने केली जाते. पण शिक्षणाचे माध्यम निवडताना अतिशय सावध असावे. शिक्षणाचे किंवा ज्ञान घेण्याचे माध्यम जर उचित असेल तर व्यक्तीची मानसिक, बौद्धिक व शारीरिक उन्नती साधणे सोपे जाते. सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषेत शिकल्याने मुले सर्वाथाने पारंगत होतील, हा पालकांचा समज असतो. हा समज चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. कारण समज करून देणारा आजूबाजूचा समाज चुकीचा आहे हे सांगणारे व ऐकणारे उरलेले नाहीत. जे सांगतात तेच त्यांच्या लेखी वेडे ठरतात. व्यक्तींकडे शब्दसंपदा अधिकाधिक असेल, तर त्याचे भाषेवर पर्यायाने वाणीवर प्रभुत्व असते. भाषा शब्दसंपदेने परिपूर्ण असता प्रत्येकाला आपले विचार आपल्या शब्दांत मांडता येतात. मनातील विचार व्यक्त झाल्याने मानसिक दडपण दूर होते. आपले विचार नवख्या भाषेत सांगणे माध्यमाच्या निवडीने अशक्य होते किंवा ते विचार व्यक्त करताच येत नाहीत. कारण परप्रांतीय भाषेतील शब्दांची संपदा ही शिक्षणापुरतीच सीमित असते. त्यामुळे विद्यार्थी, ज्ञानार्थी न होता छापखानाच तयार होतो. शैक्षणिकदृष्टया खोलवर विचार केला तर मातृभाषेत शिकणाऱ्याला मातृभाषेचे व्याकरण सहज जमते. त्यासाठी कोणतेही जास्तीचे परिश्रम करावे लागत नाहीत. त्याला नवीन भाषेसाठी पुरेपूर वेळ देता येतो व त्यातील बारकावे, व्याकरणाचे तो पुरेपूर ज्ञान घेऊ शकतो. परिणामी त्याच्या दोन्ही भाषा व्याकरणासह पक्क्या होतात. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर इंग्रजीचे ज्ञान घेतल्यास दोन्ही भाषांवर प्रभृत्व मिळविणे अशक्य नाही.